मारवा...

मारवा...
स्वर कानी पडले आणि समोरचा मंच हळू - हळू  पुसट होवू लागला.
दूर गेली ती संध्याकाळ, दूर गेला तो क्षण...
वाटले की बस्स... आता स्वर कोणते, नि कोणते शब्द?
त्या पलीकडे गेलं होते सगळं...

प्रत्येक वेळी राग ऐकताना मनात चालू होत असे चक्र...
कोणता असेल ताल?
कोणता स्वर वादी नि कोणता संवादी?

आज हे काही आलेच नाही मनात.

डोळे  मिटलेले...
आजूबाजूस शेकडो लोक असल्याचे नव्हते भान...
त्या तीव्र मध्यमात जणू विरघळूनच गेले होते सारे...

तार साप्तकाच्या रिषभावर न्यास केल्याने झालेली तळमळ ...
की कधी एकदा बिलगतोय षड्जाला...

धैवतावरुन रिषभावर येताना जो अस्थिर भाव निर्माण होत असे ,
त्यावर शुद्ध मध्यमाची हळुवार फूंकर ...

' क्या बात ', ' क्या बात ' अशी  शाबासकी मिळण्याहून अधिक मौल्यवान ते अंगावर आलेले शहारे,
जे टचकन डोळ्यात आणतात पाणी,
जे थेट भिडतात जाऊन हृदयाला,
जे दाखवतात अलगदपणे उचलून एक असा सूर्यास्त,
जो कधीच दिसत नाही उघडया डोळ्यांना...


                                                                                                                    ~ सानिका ताटके  








Comments

  1. क्या बात है सानिका!!

    ReplyDelete
  2. Sahiiiii.... vachun shahare uthle angavar.... bhariiiii

    ReplyDelete
  3. अप्रतिम अनुभुती

    ReplyDelete
  4. अगं ब्लॉग काय जबरदस्त लिहिला आहेस!!!! Salute!!

    ReplyDelete
  5. खूप मस्त! वाचताना मनात मारवा साद घालू लागतो खरोखर.. पुढच्या ब्लॉगची वाट पाहत्येय..All the best!

    ReplyDelete
  6. Replies
    1. खूप छान सानिका,मस्त लिहिले आहेस, असेच छान छान लिहित जा

      Delete

Post a Comment